प्रा. डॉ. अरुण गायकवाडसर यांचे अनुकरण आणि पुरस्कार
मित्र हो, मला आठवते. मी बी. एस्सी भाग -2 मध्ये पास झाल्यानंतर
तृतीय वर्षासाठी कोणता विषय निवडावा यासंबंधी माझे वर्ग मित्र विचार करत होते.
मित्रांचे एकमत होत नव्हते. कुणी म्हणे, घरात विचारतो. कुणी म्हणे, कुणाचे तरी
मार्गदर्शन घेतो. तर कुणी म्हणे मित्रांशी चर्चा करतो. पण मी मात्र कोणालाही विचारले
नाही किंवा कोणाचे मार्गदर्शनही घेतले
नाही. मी सरळ प्राणिशास्त्र विषय निवडला.
माझा हा निर्णय माझ्या मित्रांना
जसा अनपेक्षित होता तसाच माझ्या घरातील सर्वानाच होता. मी वर्गात नेहमीच अभ्यासात आघाडीवर होतो.
त्यामुळे वेगळा विषय निवड करेन असा मित्रांचा कयास होता. माझे थोरले बंधू भारत पेट्रोलियम
मध्ये असल्याने त्यांची अपेक्षा रसायनशास्त्र विषय निवडावा ही अपेक्षा होती. आणि त्यांनी मला तसे सांगितले ही. पण मी माझ्या
निर्णयावर ठाम होतो. दादांनी मला विचारले की, तू प्राणिशास्त्र विषय ठेऊन काय
करणार आहेस. तेव्हा मी त्यांना सांगितले होते. मला शिक्षक व्हायच आहे.’ त्यांना
माझा हा निर्णय थोडा अहमपणाचा वाटला. पण ठीक आहे तू निर्णय घेतला आहेस तर खूप
अभ्यास कर. असा उपदेश त्यांनी केला व मला संमती दिली.
मी
शिक्षक होण्याचे स्वप्न पाहीले होते. ते प्राणिशास्त्र विभागातील सर्व
शिक्षकांमुळेच. प्राणिशास्त्र विभागातील
मला लाभलेले सर्वच शिक्षक आदर्शवत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपुलकीची
वागणूक देऊन त्यांच्यातील न्यूनगंड दूर करण्याचे काम प्राणिशास्त्र विभागातील सर्व
शिक्षक करीत असतात. म्हणूनच आज अनेक विद्यार्थी जगाच्या पाठीवर महाविद्यालयाचे नाव
उज्वल करीत आहेत. त्यावेळचे विभागप्रमुख
देशमानेसर हे सुद्धा माझे प्रेरणास्थान आहेत. त्यांची शिकवण्याची शैली मी आत्मसात
केले आहे. त्यांचा मला खूप खूप उपयोग करून घेता आला. ‘Effective Teaching’ हा वसा
माझ्या अंगी साकारला आहे. त्याचा विद्यार्थ्यांना
पुरेपूर फायदा हॉट आहे. ही प्राणिशास्त्र विभागाने दिलेली अमूल्य अशी देणगी आहे.
डॉ. एस. एस. गायकवाड सर यांचा विषयातील
हातखंडा हा गुण घेता आला. त्यांच्या अभ्यासूवृत्तीचे मी अनुकरण आजही करत आहे. त्यांच्या एवढे मला जमले नाही पण
सातत्य आणि चिकाटी कशी ठेवावी हे मी त्यांच्याकडून
शिकलो. डॉ. गिरे सरांची कारकीर्द आमच्याच बॅचपासून सुरू झाली असली तरी त्यांचे
मार्गदर्शन मला आजही मिळते आहे. नाळे
मॅडमचा ही आम्हाला सहवास आणि मार्गदर्शन लाभले या सर्व शिक्षकांचा माझ्यासारख्या
ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उभे करण्यात खूप मोलाचा वाटा आहे. ही
कोणीही नाकारू शकणार नाही.
परंतु या सर्व शिक्षकांपैकी आदरणीय गायकवाड सरांचा माझ्यावर मनावर
खूप प्रभाव पडला. सरांना मी मूधोजी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून पहात होतो.
त्यांच्या प्रत्येक गोष्टी मला अनुकरणीय वाटायच्या. मला आठवते, सर साप पकडण्यात एक्स्सपर्ट
होते. ते विषारी सापसुद्धा सहज पकडायचे. त्यांची सांप हाताळण्याची पद्धत माझ्या
मनावर खूप खोलवर रूजली आणि मी सुद्धा त्यांचे अनुकरण करू लागलो. मी कुठल्याही
मार्गदर्शनाशिवाय सांप पकडणे सुरू केले. माझ्या आईला ही गोष्ट समजल्यावर तिच्या
खूप शिव्या खाव्या लागल्या. शेवटी आईसाठी मला सांप पकडणे बंद करावे लागले. पक्षी
निरीक्षण हा सरांचा आवडता विषय होता. ते ते नेहमी पक्ष्यांच्या निरीक्षणांत
गुंतलेले असायचे. मग मी सुद्धा गावाकडे आलो की, पक्षी निरक्षण करायचो. एखादा पक्षी दिसला की मी ग्रंथालयात जाऊन
पुस्तकातून माहीत घेण्याचा प्रयत्न करायचो. आज मी सरांच्या इतका नाही पण चांगल्या
प्रकारे पक्षी अभ्यासक आहे. उत्तम फोटोग्राफर आहे. याचे मूळ गायकवाडसर आहेत.
मुधोजी
महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभाग
म्हणजे संस्कारांचे गुरुकुल आहे. आपुलकी आणि प्रेमाची वागणूक देणारी ती एक
प्रयोगशाळा आहे. प्राणिशास्त्र विभागातील
सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांना कधीच एकेरी
हाक मारताना पाहिले नाही. मुलीना अहो- काहो करूनच बोलतात.ही आदर्शवत गोष्ट अत्यंत
दुर्मिळ आहे. मुलींचा सन्मान कसं करावा हे प्राणिशास्त्र विभागात शिकलो. आणि ही
गोष्ट अंगिकारून तशीच पुढे वाटचाल करीत आहे. विभागातील सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांची अतिशय तळमळीने विचारपूस करून
अडीअडचणी सोडवतात. या सर्व गोष्टींचा शिक्षक म्हणून माझ्यावर खूप प्रभाव राहिला.
आजही गायकवाडसरांना भेटण्याचा योग आला तरी ते अतिशय आपुलकीने बोलतात. त्यांच्या या वागणुकीमुळे सरांच्याप्रती असलेला
आदर आणखीनच बळावतो. असे शिक्षक लाभणे ही माझ्यासारख्या शेकडो विद्यार्थ्यांचे परम
भाग्य आहे. गायकवाडसरांची आदर्शवत ऊंची गाठणे आम्हाला कधीच शक्य होणार नाही. परंतू
त्यांच्या सारखे वागण्याचा प्रयत्न करतो.
त्यांचे आनुकरण करतो. सरांनी
दिलेली विचारांची व आदर्शाची शिकवण एक
शिक्षक म्हणून येणाऱ्या पिढीला देण्याचा प्रयत्न करत आहोत.
सरांनी
मला राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय चर्चासत्रसाठी व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित केले
होते. ही माझ्यासाठी सरांनी दिलेली सर्वात मोठी भेट होती. प्राणिशास्त्र विभागाचा माजी विद्यार्थी म्हणून
मी खूप भारावून गेलो. ज्या वर्गात शिकलो. त्याच वर्गात व्याख्यान देताना माझे मन
भरून आले होते. आपल्या गुरूच्या समोर मार्गदर्शक म्हणून बोलताना अवघडल्यासारखे
झाले होते. पण सरांनी मला धीर दिला व मला तनावमुक्त केले. मला खूप सन्मान दिला. हा
मला मिळालेल्या अनेक सन्मानातील उत्तुंग सन्मान होता.
मी
स्वप्न पाहील्या प्रमाणे सांगोला महावियालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो.
सुरुवात अवघड वाटत होती. रुजू होण्यापूर्वी मूधोजी कॉलेजमध्ये जाऊन सरांची भेट
घेतली. त्यांचा आशीर्वाद घेतला. त्यांनी
मला अनेक गोष्टीचे मार्गदर्शन केले. खंर तर मला मार्गदर्शनाची गरजच नव्हती. कारण गायकवाडसरच माझे साक्षात आदर्श होते. आज
मी तीस वर्ष शिक्षक म्हणून काम करीत आहे. याचे सर्व श्रेय सरांना जाते. सरांचे अनुकरण
करतच मी एक चांगला शिक्षक होऊ शकलो.
त्यांनी दिलेल्या विचारांची शिकवण आणि शिक्षण यांचा माझ्या जडण-घडणी मध्ये अत्यंत मोलाचा
वाटा आहे. सरांच्या बद्दल खूप काही
बोलण्यासारखे आणि लिहाण्यासारखे आहे.
त्यांच्या बद्दल एका शब्दांत सांगावयाचे म्हटले तर ‘हाडाचा शिक्षक’ हा शब्द
तंतोतंत लागू होतो.
मला अनेक पुरस्कार मिळाले त्यामध्ये आदर्श शिक्षक म्हणून अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ते सर्व पुरस्कार केवळ आणि केवळ प्राणिशास्त्र विभागाने दिलेल्या संस्कारची देणगी आहे. विशेष म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात काम करीत असताना एकलव्यासारखे मी गायकवाडसरांचे अनुकरण करत आहे. त्या अनुकरणाला हे पुरस्कार आहेत. मी फक्त माध्यम आहे. ते सर्व पुरस्कार अप्रत्यक्षपणे माझे आदर्श शिक्षक गायकवाड सरांचेच आहेत हे मी मानतो. सरांचे अनुकरण अगदी डोळे झाकून कोणीही केले तर त्यांचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही यांची खात्री आहे. सर, आज सेवानिवृत्त होत आहेत. हे सत्य असले तरी शिक्षक म्हणून ते कधीच निवृत्त होणार नाहीत. यांचा माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ठाम विश्वास आहे. सरांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सदैव रहावेत आणि सरांना उत्तम आरोग्य लाभो. हीच परमेश्वरास प्रार्थना करतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा