पक्षी निरीक्षक आणि पर्यटकासाठी सांगोला तालुका साद घालतोय.
दुष्काळी तालुका
म्हणून परिचित असलेला सांगोला तालुका महाराष्ट्र श्रीमंत तालुका म्हणूनही ओळखला
जातो. दुष्काळी परिस्थितीवर मात करून आधुनिक तंत्राची जोड देत महाराष्ट्रातीलच
नव्हे तर देशातील शेतकऱ्यांनाही एक आदर्श घालून दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला सांगोला तालुका विविध कारणासाठी देशभरात
प्रसिद्ध आहे. कार्यक्षमतेच्या जोवर सांगोला सूतगिरणी आशिया खंडात प्रसिद्ध
आहे. तालुक्याचे माजी आमदार गणपतराव
देशमुख यांचे कार्य कर्तुत्वामुळे गिनीज बुकात नोंदलेले नाव हा सांगोला तालुक्याचा
सिरपेच आहे.
सांगोला
तालुक्याला ऐतिहासिक वारसा लाभला असून पंढरपूर, मंगळवेढा, बानुरगड, शुक्राच्यारी,
स्वतंत्रपूर राजेवाडी तलाव इत्यादी पर्यटन क्षेत्र सांगोला तालुक्याला लागून आहेत.
त्यामुळे सांगोला हे पर्यटनाचा केंद्र बिंदू ठरू पहात आहे.
सांगोला
तालुक्यातील अनेक ठिकाणी असलेले
विस्तीर्ण जलाशय, जैवविविधता
संवर्धनासाठी मोलाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे सांगोला तालुका सध्या
पक्षीप्रेमीसाठी आकर्षणाचा विषय बनू पहात आहे. तर पक्षीतज्ञांच्या मते सोलापूर
जिल्ह्यात सांगोला तालुका माळढोक पक्षासाठी संभाव्य अधिवास ठरू शकतो.
ऐतिहासिक बुधेहाळ तलाव
१९०२ साली
इंग्रजांनी बेलवण नदीवर भव्य असा बांधेलेला बुधेहाळ तलाव आजही सुस्थितित आहे. या
तलावाचे वैशिष्ठ्य म्हणजे तलावाचा भराव सांगोला तालुक्यात असून पाणीसाठा सांगली जिल्ह्यातील
आटपाडी तालुक्यात आहे. हा तलाव पूर्ण
क्षमतेने भरल्यास मोठ्या धरणासारखा भास होतो. तलावाच्या परिसरात तटबंदी असलेल्या
वस्तू आजही सुस्थितीत असून वास्तुकलेचा तो एक सुंदर नमुना आहे. बुधेहाळ तलाव
पक्षीप्रेमी मंडळीसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू मानला जातो. वर्षानुवर्षे देश
विदेशातून येणारे कंठेरी चिखल्या, तुतारी, खंड्या, नदी सुरय, ब्राम्हणी बदक,
जांभळी पानकोंबडी, शेकाट्या, लांडे बदक, चमच्या, चित्र बलाक, पाणकावळा, इत्यादी विविध प्रजातीच्या
दुर्मिळ पक्षाबरोबरच विदेशातून येणारे फ्लेमिंगो पक्षी, पर्यटकांना साद घालत
असतात. त्याचबरोबर तलावाच्या परिसरात
खाटिक, कोतवाल, पावश्या, निखर, चष्मेवाला, वेडा राघू, ब्राम्हणी घार, ससाणा,चंडोल,
शिंपी आदी पक्षी वावरताना दिसून येतात. दरवर्षी महाराष्ट्रातील अनेक पक्षी
निरीक्षक बुधेहाळ तलावाला आवर्जून भेट देत असतात.
बुधेहाळ
तलावापासून जवळच शिवरायांच्या अनेक हिऱ्यांपैकी गुप्तहेर खात्यांचे प्रमुख
स्वराज्य रक्षक बहिर्जी नाईक यांची समाधी
बानुरगडावर आहे. इतिहसात हा किल्ला भूपाळगड नावानेही ओळखला जातो
हे स्थान शिवप्रेमीसाठी स्फूर्तिस्थान आहे. बहिर्जी नाईक यांची समाधी
सांगली व सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर सांगोल्यापासून अगदी जवळ असलेल्या. बानुरगड हा किल्ला आकाराने व विस्ताराने प्रचंड
मोठा आहे. एक तलाव, महादेव मंदिर, समाधी व जुजबी तटबंदी असे मोजके अवशेष शिल्लक आहेत.असे असले तरी
पर्यटकांसाठी ते एक स्फूर्तीस्थान आहे. स्वराज्यासाठी बहिर्जी नाईक यांनी दिलेल्या
बलिदानाच्या पाउलखुणा आजही बानुरगडावर पहावयास मिळतात.
सांगोला
तालुक्याच्या सीमावर्ती भागात माणनदीवर सुमारे १४० वर्षापूर्वी ब्रिटीश राणी
व्हिक्टोरियाच्या मार्गदर्शनाखाली बांधलेला विस्तीर्ण राजेवाडी तलाव सुद्धा
प्रेक्षणीय आहे. याया तलावाचे वैशिष्ठ्य म्हणजे
तलावाचा भाराव व दारे सांगली
जिल्ह्यात असून पाणीसाठा मात्र सातारा जिल्ह्यात आहे. या तलावाच्या परिसरात थोडी
पडझड झालेला परंतु वास्तुकलेचा उत्तम नमुना असलेला व्हिक्टोरिया राणीसाठी
बांधलेला बंगला पहावयास मिळतो.
त्याच बरोबर विविध
प्रकारचे देशी विदेशी पक्षी पहाण्याची संधी मिळते.
वाढेगाव बंधारा-
नव्याने उदयास आलेले पक्षी वस्ती स्थान
सांगोला –
सोलापूर रोडवर सांगोला शहरापासून ५ किमी अंतरावर विलोभनीय असा वाढेगावजवळ बंधारा आहे. याच ठिकाणी माणगंगा व अप्रुगा या
दोन नद्याचा संगम याच झाला आहे. संगमावर महादेवाचे सुंदर मंदिर असून
इथले इथला परिसर नयनरम्य आहे. मंदिर परिसरातून पर्यटकांना पक्षी निरीक्षणाचाही
आस्वाद घेता येतो. नाम्या , जांभळी पानकोंबडी, नदी सूर्य, तुरारी, व्हाईट
आयबीस, ब्लॅक आयबीस, हळदीकुंकू बदक, टिबुकली,
कंठेरी चिखल्या, शेकट्या, जांभळा बगळा, चमचा, आदी पक्षी मनमुराद जलाशयाचा आनंद घेत
असतात.
चिंचोली तलाव
सांगोला अकलूज
रस्त्यावर अगदी ५ ते ७ किमी वर विस्तीर्ण असा चिंचोली तलाव आहे. हा तलाव सातत्याने
भरलेला असतो. मात्र उन्हाळ्यात या तलावाची पातळी खूप खालावते. मात्र शेतीसाठी कृत्रिम रित्या भरून घेतला जातो. त्यामुळे
तलावात मोठ्या संख्येने विहार करीत असल्याचे पहावयास मिळते.
वंचक, शर्ती,
नदी सुरय, पाणबुडी बदक, लांडे बदक, टीबुकली,
हळदीकुंकू, काळ्या डोक्याचा शराटी, पांढऱ्या मानेचा करकोचा, चक्रवाक,
कंठेरी चिखल्या, तुतारी, चमच्या, जांभळा बगला, जांभळी पाणकोंबडी, सूरय, पक्षी, आदी
पक्ष्याबरोबर रोहित पक्षीसुद्धा कधीमधी जलाशयास भेट देतात.
इतिहासाची साक्ष
देणारे शिवकालीन अंबिका मंदिर आणि तटबंदी
१४ व्या शतकात
बांधलेले सांगोल्याचे ग्रामदैवत असलेले अंबिका माता मंदिर अनेक कारणांसाठी इतिहासात प्रसिद्ध आहे. सदाशिवभाऊ पेशव्यांनी १७५० मध्ये सांगोल्याच्या किल्ल्यावर स्वारी केली. हे युद्ध
१५ दिवस चालले व हे ठाणे त्यांनी ताब्यात
घेतले. याच अंबिका मंदिरात झालेल्या
तहानुसार छत्रपती राजाराम यांना नामधारी करून मराठी सत्तेची सर्व सूत्रे
पेशव्यांच्या ताब्यात गेली. असे म्हटले जाते की, एकदा छ. शिवाजी महाराज याठिकाणी
आले असल्याची खबर मोगलांना मिळाली. त्यांच्यावर हल्ला करण्याच्या उद्देशाने मोगल
आले परंतु, महाराज आढळून न आल्याने या अंबिका मंदिराची नासधूस केली. मोगलाईचे घाव
सोसलेल्या भग्न मूर्ती मोगलाईच्या अत्याचाराची जाणीव करून देतात. आज ही
सांगोल्याच्या किल्ल्याच्या तटबंदीची
साक्ष देणारी वेस सोलापूर कोल्हापूर महामार्गालगत सांगोल्याच्या इतिहासाची साक्ष
देत आहे.
मौजे नाझरे
धार्मिक व आध्यात्मिक स्थळ:
सोलापूर -
कोल्हापूर रोडवर सांगोल्यापासून १०ते १२ किलोमीटर वर ३०० वर्षांची संत परंपरा
असलेले नाझरे गावासाठी रस्ता फुटतो. याच गावातील अनेक संतापैकी एक असलेले चौदा
हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिणारे संत श्रीधरस्वामी
होऊन गेले. या गावात अनेक संतानी समाधी घेतली असल्याचे सांगितले जाते. हे
आध्यत्मिक ठिकाण पहाण्यासारखे आहे.
स्वतंत्रपूर
सांगोल्या पासून ३० ते ३५ किमीवर आटपाडी तालुक्यात स्वतंत्रपूर अर्थात कैद्यांची खुली वसाहत असून आशिया खंडातील वैशिष्ठ्यपूर्ण असलेली कैद्याची वसाहत आहे. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने १९३९ मध्ये उभारलेले जन्मठेपेची शिक्षा भोगणारे अनेक बंदी मुक्त वावरत असतात. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम’ हे भावपूर्ण गीत असलेला व व्यंकटेश माडगुळकर लिखित दो आंखे बारा हात हा चित्रपट स्वतंत्रपूर वर आधारित आहे. पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावे असे ठिकाण आहे.